
मुंबईतील हुंडाविरोधी चळवळ आयोजित लेखन स्पर्धेत कृषी महाविद्यालय, फलटणच्या विद्यार्थिनींनी यश मिळवले. वेदांतिका गेजगे हिला तृतीय क्रमांक तर विजयश्री मदने हिला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र.
स्थैर्य, फलटण, दि. २१ जानेवारी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थिनींनी हुंडाविरोधी चळवळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित लेखन स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
‘भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व’ या विषयावर आयोजित लेखन स्पर्धेत कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी वेदांतिका गेजगे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला उत्तेजनार्थ प्रमाणपत्रासह रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विजयश्री मदने हिने उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
या लेखन स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागाचे प्रा. ए. एस. रासकर, प्रा. सौ. डी. एस. निकम आणि प्रा. आर. डी. नाईकवाडी यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्रा. अरविंद निकम, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी विद्यार्थिनी व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
