स्थैर्य, फलटण : अयोध्या येथे आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी मध्ये त्यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यावरून चाललेल्या राजकारणामध्ये मला काडीचाही रस नाही. परंतु मी प्रभू श्रीरामचंद्रांचा निस्सिम भक्त असून पुढील वर्षी ५ ऑगस्ट पर्यंत फलटण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दवाखाना आपण उभारणार आहोत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्याची आवश्यकता फलटण शहरासह फलटण तालुक्याला किती आहे, हे आपल्या सर्वांना समजलेले आहे. त्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती हा दवाखाना लवकरात लवकर उभारेल व या दवाखान्याचे उद्घाटन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे नेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते आपण घेऊ असे आश्वासन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिलेले आहे.
या पोस्ट मध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले आहेत की, मी प्रभू श्रीरामचंद्रांचा भक्त आहे. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी हिंदु आहे परंतु मी सनातनी बिलकुल नाही. मी मराठा आहे, व त्याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु मी बहुजन मराठा समाज मानतो, सकल मराठा समाज नाही. प्रभु श्रीरामचंद्रांना माझा कायमच नमस्कार राहील, बीजेपीच्या राजकारणाला नाटकाला कधीही माझे समर्थन नसेल.
प्रभू रामचंद्रांचे नाव हे रघुनाथ आहे व तेच माझे नाव आहे त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रा मुळेच माझी ओळख आहे व श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर हेच राजे गटाचे सर्वेसर्वा असून आगामी येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षापर्यंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या साथीने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा दवाखाना हा सुरू झालेला असेल एवढेच मी यावेळी आश्वासन देऊ इच्छितो, असे ही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट द्वारे स्पष्ट केलेले आहे.