दैनिक स्थैर्य | दि. ०८ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
सध्या फलटण आगारात ९० बस आहेत. मात्र, त्यातील तीन ते चार बसेस रोज बंद पडत असतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी सध्या फलटण आगाराला किमान २५ नव्या बस मिळणे आवश्यक आहे.
याबाबत माहिती अशी, फलटण आगार एक व्यस्त बसस्थानक आहे. येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. फलटण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रवाशांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात या आगाराला बसची कमतरता आहे. इंजिन, हेवी बोडी रिपेअर, अपघात इत्यादी कामासाठी दैनंदिन ९ ते १० बसेस फलटण विभागात असणे आवश्यक आहे. सध्या या आगारात ९० बस आहेत. या ९० पैकी दोन चार बस रोजच बंद पडतात. त्या सातत्याने दुरूस्त कराव्या लागतात. त्यामुळे वापरायला सरासरी ८० ते ८२ बसेस मिळतात. प्रवास करताना मध्येच एसटी बस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊन मानसिक तसेच शारीरिक त्रासही सहन करावा लागतो आहे. या आगारासाठी प्रस्तावित बस संख्या ११५ आहे. तसेच १४ वर्ष होऊन गेलेल्या बसेस ८ ते ९ मार्च, एप्रिल २०२३ अखेर स्क्रॅप होणार आहेत. ती कमतरता भरून काढण्यासाठी इतर आगाराप्रमाणे फलटण बस आगारातसुद्धा नव्या बस मिळणे आवश्यक आहे. २०१८ – २०१९ ची तुलना करता नवीन बसेस कमीत कमी २५ या फलटण आगाराला हव्या आहेत. तरंच फलटण आगारात वेळेवर बस सुटतील व प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.