
दैनिक स्थैर्य | दि. 02 जानेवारी 2023 | फलटण | फलटण शहरात जी आता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. याबाबत फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे. अतिक्रमण धारकांचा सर्वे न करता व त्यांना पूर्व कल्पना न देता अतिक्रमण पाडत असतील तर ही मोहीम स्थगित करून संपूर्ण शहरातील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात यावा. यामध्ये कोणते अतिक्रमण आहे व कोणते अतिक्रमण नाही, याचा सविस्तर सर्वे करूनच ही मोहीम पुन्हा सुरू करावी, असे निर्देश सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
फलटण शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, फलटण शहरामध्ये जी आता अतिक्रमणे आहेत. त्याचा सविस्तर सर्वे करून त्या अतिक्रमण धारकांना याबाबत पूर्व कल्पना देवून ही अतिक्रमणे काढण्यात यावीत. अतिक्रमण धारकांना पूर्व कल्पना दिल्यानंतर अतिक्रमण धारकांनी विहित कालावधीत अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत. जर विहित कालावधीत त्यांनी अतिक्रमणे काढली नाहीत तर त्यांची अतिक्रमणे ही काढण्यात यावीत.