फलटण तालुक्यातील सासवड येथील पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सात जणांना अटक : पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०९ : फलटण तालुक्यातील झणझणे सासवड, ता. फलटण येथे काही दिवसांपुर्वी एचपी कंपनीची पेट्रोलची पाईप लाईन फोडुन चोरी करण्याचा प्रयत्नात दोन हजार लिटर पेट्रोल आजूबाजूच्या जमीनीत मुरले व विहरीत उतरले होते. याप्रकरणी लोणंद पोलीसांनी पर्दाफाश करत सातजणांना अटक केलेली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी दिली.

याबाबत माहिती अशी, 23 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सासवड, ता. फलटण गावचे हद्दीतून जमीनीच्या खालून जाणारी एचपी कंपनीची पेट्रोलची पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातुन मोठी गळती लागून तब्बल दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीचे शेतात पसरले. जमीनीत मुरलेले पेट्रोल आजुबाजुचे विहीरीत उतरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच 1 लाख 90 हजार रुपयांचे पेट्रोलचे नुकसान झाल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेडचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस ठाणेस दिले तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विशाल के. वायकर यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि विशाल वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत अंतरराज्य टोळीतील सात आरोपी निष्पन्न करुन त्यांना गुन्हे शाखा क्रमांक दोन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेवून इंट्रॉगेशन स्किलचा वापर करुन त्यांच्याकडे तपास केला असता यातील अनित हरीशंकर पाठक वय 32 रा.मुळ गाव पिंडराई पटखान जि.वाराणसी राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड, बाळू आण्णा चौगुले वय 42 रा.रामनगर चिंचवड पुणे, मोतीराम शंकर पवार वय 20 रा. गवळीमाथा भोसरी पुणे, इस्माईल पिरमहंमद शेख वय 62 रा. डी-मार्ट शेजारी पिपंरी पुणे, शाम शिवाजी कानडी वय 50 रा. वाल्हेकरवाडी चिंचवड, दत्तात्रय सोपान लोखंडे वय 41 रा. सासवड ता. फलटण जि.सातारा, नामदेव ज्ञानदेव जाधव वय 28 रा. दालवडी, ता. फलटण जि. सातारा अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने तसेच त्यांनी अशा प्रकारचे पेट्रोल चोरी सारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक इतर जिल्हयामध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात हजर करुन त्यांची दि 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.

पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना.संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सपोफौ. अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत सिकिलकर, पोहवा महेंद्र सपकाळ, संजय जाधव, पोकॉ. अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत गार्डे, शिवाजी सावंत, चालक विजय शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

सपोनी विशाल वायकर यांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले विशेष अभिनंदन
गुन्ह्याचा यशस्वीरित्या तपास केल्याबद्दल पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर आणि त्यांचा टिमचे अभिनंदन केले. तसेच आरोपींना एमपिडीए एक्ट लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!