दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये सोमवार, १३ मार्च रोजी महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये ‘व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. सचिन मोरे (संपादक, ‘धैर्य टाइम्स’ वृत्तपत्र तसेच प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष) आणि प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर लाभले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रा. डॉ. संदेश विचुकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्व म्हणजे काय? त्याचे महत्त्व? व कार्यक्रमाचे औचित्य याबद्दल विचार व्यक्त केले. यानंतर त्यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचा परिचय करून दिला.
‘अतिथी देवो भव’ या परंपरेनुसार मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यामध्ये प्र. प्राचार्य डॉ. दिपक राऊत यांनी तज्ञ मार्गदर्शक श्री. सचिन मोरे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. तसेच कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश आढाव यांना प्रा. तुपे सरांनी गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तज्ञ मार्गदर्शक श्री. सचिन मोरे यांनी कार्यशाळेदरम्यान व्यक्तिमत्वाविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच मार्गदर्शनामध्ये सांगितले की, ‘व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या अंतर्बाह्य क्षमता व गुणांचे संघटन होय. आज विद्यार्थ्यांना आपल्या ‘स्व’ची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जितक्या लवकर त्यांना आपल्या क्षमता, बलस्थान, अभियोग्यता, अभिक्षमता, अभिरुची यांची माहिती होईल, तितक्या लवकर त्यांना आपल्या करिअरची निवड करून वाटचाल करणे सोपे जाईल. प्रभावी व्यक्तिमत्व हे वरदान नसून प्रयत्नपूर्वक प्राप्त केले जाते. सर्वच यशस्वी लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, माणसांच्या यशामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोलाचा वाटा असतो. व्यक्तिमत्त्वाच्या आंतरिक गुणांमध्ये बुद्धिमत्ता, समायोजन क्षमता, सकारात्मकता, आत्मविश्वास, जिज्ञासा, संवाद कौशल्य, सृजनशीलता, धाडस, जिद्द, प्रयत्नवाद इत्यादी गुण आवश्यक आहेत. आपल्या आजूबाजूला प्रत्येक लोकांना आपण पाहत असतो, पण त्यातील प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे लोक आपली छाप पाडतात व कायम स्मरणात राहतात. व्यक्तिमत्त्वाचा विकास जन्मापासूनच सुरू होतो व जीवनभर सुरूच राहतो. पण, शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये हा विकास अधिक गतीने होतो. त्यामुळे आपण प्रभावी, सुदृढ, आकर्षक व्यक्तिमत्वासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. शिकण्याची क्रिया जीवनामध्ये आनंद निर्माण करते. तसेच क्रियाशील बनवते. थोडक्यात व्यक्तिमत्व विकास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आज राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच सर्वच क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्वाचे लोक यशस्वी होताना दिसत आहेत. व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच असते पण आपण आपल्या क्षमतांचा विकास करून व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आज काळाची गरज आहे. याबरोबरच त्यांनी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आईन्स्टाईन, ए. पी. जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर इत्यादी यशस्वी व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करून प्रभावी व्यक्तिमत्वाबाबत विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रेरणास्पद मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव (दैनिक ‘तरुण भारत’ फलटण विभागीय संपादक) यांनी व्यक्तिमत्व विकास याबद्दल विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले व व्यक्तिमत्व विकास याची आवश्यकता आणि महत्त्व स्पष्ट केले. यानंतर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दिपक राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व विषयासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच व्यक्तीप्रदर्शन व व्यक्तिमत्व यामधील फरक स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. आरती शिंदे मॅडमने केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी करून दिला. पाहुण्यांचे स्वागत सत्कार प्र. प्राचार्य डॉ. दिपक राऊत यांनी केला. तसेच आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा. श्री. बी. एम. तुपे यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बी. ए. व बी. कॉम. वर्गातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच मार्गदर्शकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांना प्रभावित केले.