
दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | फलटण |
शाळेतील मुलं म्हणतात.. ‘वाचतोय पण लक्षात राहत नाही’, ‘अभ्यास करतोय पण कळत नाही’. त्यांना सांगा, तू फक्त सतत अभ्यास करत रहा. सततचे सातत्य, नंतर तुमची सवय बनते आणि सवयच तुमचे चरित्र आणि चारित्र्य घडवते, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बानुगडे-पाटील बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, श्री गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने-पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा जाधव उपस्थित होते.
नितीन बानुगडे – पाटील पुढे म्हणाले, मुलं घडवायची असतील तर त्यांच्यात जिज्ञासा हवी. आई ही मुलांची पहिली शाळा असते तर शाळा ही मुलांची दुसरी आई असते. या दोन आईंच्या कुशीत मुलं घडत असतात. मुलांना काय घडवायचं, हे ध्येय ठरवा. ध्येय ठरलं की नियोजन करा. नियोजनानंतर प्रत्यक्ष कृतीला आरंभ करा. या जगात अशक्य काहीच नाही, हे मुलांना ठामपणे सांगा. नितळणार्या घामाच्या थेंबावरच यशाच्या वृक्षाची उंची अवलंबून असते. उंची किती वाढवायची, हे वृक्षावर नव्हे तर त्याच्या मुळाशी आपण किती घाम गाळतोय यावर अवलंबून असते. जो अखंडपणे काम करतो तो दीर्घायुषी ठरतो. जो निवांत राहतो तो अल्पायुषी होतो. आपल्या मुलांना कष्ट करायला शिकवा. हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांमध्ये सगळं आहे, फक्त प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या. मुलं निश्चितपणे घडतील.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, देशाभिमान जागृत करणारी प्रेरणा गरजेची असून चांगले नागरिक, अधिकारी घडविण्यासाठी येणार्या स्पर्धा युगात अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा प्रेरणादायी ठरेल.
कार्यक्रमासाठी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यार्थी विकास फौंडेशनचे मार्गदर्शक रूपेश जाधव यांनी केले.
सूत्रसंचालन विकास पवार यांनी केले तर आभार सुभाष जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिरूप परीक्षेचे सर्व तालुका समन्वयक व मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.