
स्थैर्य, पुणे, दि. १४ : पुण्यातील कॉलेज ऑफ नर्सिंग, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला एम.एस्सी (नर्सिंग) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सन 2020-21 पासून एम.एस्सी (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) ची प्रवेशक्षमता 2 वरुन 6 तर एम.एस्सी (चाईल्ड हेल्थ नर्सिंग) ची प्रवेशक्षमता 2 वरुन 4 करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि चाईल्ड हेल्थ नर्सिंग या विषयातील एम.एस्सी. (नर्सिंग) पदव्युत्तर अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता अनुक्रमे 6 आणि 4 राहणार आहे. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने एम.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिटयुशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील प्रवेशक्षमता वाढीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश होतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.