‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांची कामगिरी महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. जळगाव येथील शिवांगी काळे हिने वीरता श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने नवसंशोधनमध्ये, मुंबईतील जिया राय तसेच नाशिकच्या स्वयम पाटीलने क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळवला आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!