स्थैर्य, सातारा, २२: नोकरी लावतो, टेंडर मिळवून देतो, अशी आमिषे दाखवून महिलेची 44 हजारांची फसवणूक करणार्या भामट्यास शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तोसिफ दस्तगीर शेख रा. सरताळे, ता. जावली असे संशयीताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्याकडे तक्रार निवारण दिनाला सातारा शहरातील बुधवार पेठेत राहणारे अमीन शेख यांनी एक फसवणुकीबाबत तक्रार नोंदवली होती. जावली तालुक्यातील एका इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयात कामास आहे, असे सांगून त्यांच्या पत्नीस नोकरीस लावतो म्हणून व फिर्यादी यांना ब्लिचींग पाऊडरचे टेंडर मिळवून देतो, असे म्हणून त्यांच्याकडुन रोख रक्कम 44 हजार 200 रुपये घेतले. परंतु, नोकरीस न लावता व टेंडर मिळवून न देता त्यांची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. तक्रारीचे गांभीर्य ओळखून श्रीमती आंचल दलाल यांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून आरोपीस अटक करण्याच्या सुचना शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकास दिल्या. त्यानुसार सपोनि विशाल वायकर यांनी तक्रार दाखल करुन घेवून संशयीत आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले.
संशयीताचे मूळ गाव सरताळे असले तरी तो तेथे राहत नसल्याचे समजले. त्यानंतर सपोनि विशाल वायकर व पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीव्दारे कुडाळ, ता. जावली येथे जावून सापळा रचून रात्री उशिरा त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीने अशाच प्रकारे इतर लोकांची देखील फसवणुक केली असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शाहुपूरी पोलिसांनी ज्यांची फसवणुक झालेली असेल अशा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आशिष कुमठेकर तपास करीत आहेत.
ही कारवाई सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, लैलेश फडतरे, अमित माने. पो. कॉ. स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी केली आहे.