दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा टक्का वाढलेला आहे. यावेळी १,१५,००४ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या निवडणुकीत ९८ हजार ८२८ महिला मतदारांनी मतदान केले होते. गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत तब्बल १६ हजार १७६ महिला मतदारांची संख्या वाढलेली दिसत आहे. महिला मतदारांचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्थ्यावर पडणार आहे, हे उद्याचा निकालच सांगेल. मात्र, त्यापूर्वी हा महिला मतदारांचा वाढलेला टक्का उमेदवारांच्या धाकधुकीचा व जाणकारांच्या विश्लेषणाचा विषय बनला आहे.
फलटण विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दीपक चव्हाण, महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सचिन पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व संविधान समर्थन समितीकडून प्रा. रमेश आढाव हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने महायुती सरकार खडबडून जागे झाले होते. त्यानंतर महायुती सरकारने राज्यात अनेक योजनांचा पाऊस पाडला. त्यामध्ये महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. महिला मतदारच आपल्याला विधानसभेत तारक ठरणार आहेत, हे लक्षात आल्याने महायुती सरकारने ही योजना तात्काळ अंमलबजावणीसाठी घेतली. प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला १५०० रुपये टाकण्यास सुरुवात केली. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या बँक खात्यात तब्बल ७,५०० रुपये सरकारने जमा केले. यामुळे महिला मतदार महायुती सरकारवर खूश झाल्याचे दिसत होते. हा फॅक्टर नक्कीच फलटण विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवणार आहे, हे निश्चित. त्यामुळे महिला मतदारांचा वाढलेला टक्का महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना फायद्याचा ठरणार आहे, असे दिसत आहे.