कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य – चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । मुंबई । कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे.

ते म्हणाले की, भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही.


Back to top button
Don`t copy text!