लोकप्रतिनिधींनी भाऊ खुटाळे यांचा आदर्श घ्यावा – देवेंद्र भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । सातारा । लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधीच राज्य कारभार करीत असतात. अशा लोकप्रतिनिधींनी वेळ प्रसंगी पदरमोड करून विकास कामे करण्याचा जो आदर्श सातारा शहराचे उप नगराध्यक्ष राहिलेले  दूरदृष्टी असलेले उद्योजक, गुंतवणूकदार कृष्णाजी बाबुराव उर्फ भाऊ खुटाळे यांनी घालून दिला आहे, तो सतत डोळ्या समोर ठेवला पाहिजे असे आवाहन निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले.ते  खुटाळे कुटूंबाचे अध्वर्यू, जेष्ठ उद्योजक, कर्तबगार व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते कै कृष्णाजी उर्फ भाऊ खुटाळे यांच्या १२० व्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत श्री संभाजीराव पाटणे होते. कार्यक्रमाचे आयोजन समस्त खुटाळे कुटुंब व आप्तेष्ट यांचेवतीने काल सातारा येथे करण्यात आले होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, नागरिकांची गैरसोय पाहून भाऊंनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ स्व खर्चाने पुल बांधला,जो आजही चांगला असून खुटाळे ब्रीज म्हणून ओळखला जातो. भाजी मंडी साठी स्वतःची जमीन दिली या प्रमुख कामांबरोबरच अनेक लोकोपयोगी कामे स्वतःच्या पैशातून केली.या सर्व बाबींमुळे सातारा शहराच्या विकासात मोठी भर पडली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत तत्पर असत.वेळप्रसंगी स्वतः त्यांना मदत करीत. या त्यांच्या गुणांचा प्रसार होण्यासाठी खुटाळे परिवाराने त्यांचे चरित्र,माहितीपट प्रसिध्द करावे तसेच आदर्श नगरसेवक पुरस्कार सुरू करावा,अशी सूचनाही त्यांनी केली.
या प्रसंगी बोलताना दुसरे प्रमुख पाहुणे,थोर शास्त्रज्ञ ,लेखक डॉ दत्तप्रसाद दाभोलकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन भाऊंनी सातारा शहरात वीज येण्यासाठी कसे प्रयत्न केले, वीज घरासाठी स्वतःची जमीन दिली या व इतर अनेक आठवणी जागवल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना श्री संभाजीराव पाटणे यांनी त्यांनी आकाशवाणी , वृत्तपत्रांसाठी लिहिलेल्या लेख मालांमध्ये भाऊंच्या   थोर गुणांचे कसे वर्णन केले आहे,हे सांगून त्यांचे चरित्र प्रसिध्द व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळेस प्रातिनिधिक स्वरूपात उद्योजक बाळासाहेब गोनुगडे, नितीन माने, श्रीधर कंग्राळकर व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांचा सत्कार करण्यात आला. या उद्योजकांनी त्यांची जडण घडण,यश प्राप्ती या विषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर सल्लागार तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत कासार यांनी केले. तर सूत्र संचालन चित्रा भिसे यांनी केले.
या वेळी भाऊ खुटाळे  यांचे पुतणे उद्योजक श्री शिरीष खुटाळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे भाऊ खुटाळे यांच्या जीवन कार्याची प्रभावीपणे माहिती दिली.
 यावेळी सौ सुवर्णा सातपुते, सुरेखा तिवाटणे, सौ आशाताई कुंदप,सौ लता झुटींग, पद्माकर खुटाळे, आणि अन्य आप्तेष्टांनी  त्यांच्या विविध आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमास खुटाळे कुटुंब, आप्तेष्ट, उद्योजक, विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!