आपले दीपक चव्हाण ‘ओरिजीनल माणूस’ : खा.डॉ.अमोल कोल्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | पिंपोडे | ‘‘समोरच्या उमेदवाराचा रिपोर्ट आपल्याकडं आला आहे. आपल्याला आपलं आडनांव बदलायची गरज नाही. आपल्याला आपलं नाव बदलायची गरज नाही. तुला भेटलो की तुझ्यासारखा टिळा लावणार, तुला भेटलो की तुझ्यासारखा गुलाबी शर्ट घालणार; असलं काहीही करायची आपल्याला गरज नाही. जे आहे ते ओरिजीनल असलं पाहिजे. जर माणूस ओरिजीनल असेल तरच लोक त्याला साथ देतात आणि दीपक चव्हाण ओरिजीनल माणूस आहे; त्यामुळे ते विजयी चौकार मारणार आहेत’’, असा विश्‍वास खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे बु.॥ (ता.कोरेगांव) येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चोरीची वस्तू अभिमानानं मिरवता येत नाही

खासदार डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, ‘‘दिल्लीतल्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले. हे दोन्ही वार त्यांनी पाठीवर केलेत. जेव्हा पाठीवर वार होतो तेव्हा जखम काळजात लागते. त्या काळजाचा जो सल आहे त्याचा व्यवस्थित हिसाब केल्याशिवाय शांत बसवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला झुकवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत. चोरीची वस्तू अभिमानानं मिरवता येत नाही. आपल्या शरद पवारांचा पक्ष, त्यांचं घड्याळ हे चिन्ह त्यांनी चोरलेलं आहे. त्यामुळं चोरलेलं घड्याळ बंद पाडण्याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे.’’

महायुतीचे सरकार हद्दपार करायची वेळ आली आहे

‘‘लोकसभेला मतांची कडकी झाल्यामुळं त्यांना विधासभेआधी बहिण लाडकी झाली आहे. खरं तर आमच्या सोयाबीनला भाव द्या, दुधाला भाव द्या, रोजगार द्या, महागाई कमी करा अशी मागणी इथली माता – भगिनी करत आहेत. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणारे महायुतीचे सरकार आहे. महायुती सरकारच्या काळात दिवसाला आठ तर महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार शेतकरीविरोधी आयात धोरण राबवत आहे. अशा परिस्थितीत नांगरायचं काय आणि पेरायचं काय हा प्रश्‍न शेतकर्‍याला पडत असेल तर महायुतीचे सरकार हद्दपार करायची वेळ आली आहे’’, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

आमदार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा आमदार करा

‘‘फलटण तालुका नेहमीप्रमाणे शरद पवारांच्या विचाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. चिन्ह बदललं आहे. आपलं घड्याळ चोरीला गेलं आहे. आता घड्याळाच्या गजरावर उठायचं नाही तर तुतारीच्या आवाजावर उठायचं आहे हे लक्षात घेवून आमदार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा आमदार करा’’, असे आवाहनही शेवटी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना केले.


Back to top button
Don`t copy text!