दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । पाचगणी । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळ असेलेल्या पाचगणी-महाबळेवर येथील व्यापार्यांकडून विरोध होत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या बाजारपेठ व परिसरातील व्यापारी संघटनांनी आज लॉकडाउन विरोधात निषेध फलक दाखवत गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी चौकात आज सकाळी 11 वाजता मुख्य रस्त्यावर व्यापार्यांनी आपापल्या दुकानासमोर हातात फलक घेऊन शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. व्यापारी जगवा रोजगार वाचवा, न्याय द्या, न्याय द्या छोट्या व्यापार्यांना न्याय द्या अशा आशयाचे फलक व्यापार्यांनी येणार्या-जाणार्या वाहनधारकांना दाखवत आपली प्रशासनाविरोधात असलेली तीव्र नाराजी व्यक्त केली.या अनोख्या आंदोलनास शहरातील व्यापार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनात पाचगणी व्यापारी असोसिएशन, पारशी पॉईंट व्यापारी, टॅक्सी असोसिएशन संघटनेने सहभाग नोंदवला आणि सर्व दुकाने व पॉईंट सुरू करण्याची मागणी केली.