स्थैर्य, फलटण दि. २० : बांधकाम विभागाकडील जनसुविधा, स्थानिक विकास कार्यक्रम, अंगणवाडी बांधकामे व इतर योजनेतील सन 2019 – 20 या आर्थिक वर्षातील कामे 31 मार्च पूर्वी पूर्ण करावीत. जी कामे पूर्ण होणार नाहीत ती कामे रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत; अशा सूचना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्या.
फलटण पंचायत समिती अंतर्गत सुरु असणार्या विकास कामांबाबत आढावा बैठक नुकतीच फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली फलटण पंचायत समितीमध्ये पार पडली. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीस पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ.रेखा खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्य बाळासो ठोंबरे, सचिन रणवरे, संजय सोडमिसे, सौ.प्रतिभा धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील 10 वर्ग खोल्यांना 18 फेब्रुवारी 2021 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामध्ये माझेरी 2, हिंगणगाव 2, शेरेचीवाडी (हिंगणगाव) 2, मुंजवडी 1, आसू 1, खटकेवस्ती 1 व सांगवी 1 या ग्रामपंचायतीकडील वर्ग खोल्यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय आदर्श शाळा प्रकल्पासाठी तरडगाव व माझेरी जिल्हा परिषद शाळेची निवड झालेबद्दल शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून शैक्षणिक जागृतीबाबतच्या सूचना आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांनी ज्या प्राथमिक शाळांना शौचालये नाहीत त्या 37 शाळांचे प्रस्ताव सादर करणेबाबत सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोटे यांनी फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा बैठकी दरम्यान सादर केला. सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर झालेल्या कामांची माहिती देताना 257 घरकुलांपैकी 155 घरकुले पूर्ण झाल्याचे सांगितले.
सभेदरम्यान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच घरकूल योजनेचे भूमिपूजन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
विनायक गुळवे यांनी आभार मानले.