
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून, सर्व प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन आमदार सचिन पाटील यांनी दिले. येथील तहसील कार्यालयात आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीमध्ये तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या एकूण २१ प्रलंबित मागण्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील दिव्यांगांना आरक्षणानुसार ५% गाळे वाटप करणे, उपजिल्हा रुग्णालयात विशेष सेवा देणे, अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्याने रेशनचा लाभ देणे आणि पोलीस पाटील दाखल्यासाठी शुल्क सवलत देणे या मागण्यांचा समावेश होता.
यावेळी दिव्यांगांच्या घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. एकूण ३१ पैकी ७ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात, तर १९ प्रस्ताव तहसीलदारांकडे प्रलंबित असून, ते तातडीने मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी दिले.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींना सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सक्त सूचना आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले, “दिव्यांग बांधवांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी कायम उभा राहीन.”
या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार गुंजवटे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, नगरपालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. धुमाळ, प्रहार संघटनेचे सागर गावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.