
दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । फलटण । वारुगड आणि रेडे घाट या दोन महत्त्वाच्या घाट रस्त्यांची फलटण करांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबीत मागणी पूर्णत्वास नेण्यात महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यशस्वी झाले असून राज्य शासनाने त्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह ३८ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केल्याची माहिती आ. दिपकराव चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील रेडे घाट (आळजापूर) आणि वारुगड (गिरवी) या दोन्ही घाट रस्त्यांना आज महाराष्ट्र विधान सभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रेडे घाट रस्त्याच्या भूसंपादनासाठी ८ कोटी आणि घाट रस्त्यासाठी १५ कोटी आणि वारुगड घाट रस्त्यासाठी १५ कोटी अशा एकूण ३८ कोटी रुपयांच्या भरीव निधीला राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण – कोरेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या आणि विशेषतः फलटणहुन कराड, कोल्हापूर, बंगलोर कडे जाणाऱ्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी हे दोन्ही मार्ग अत्यंत उपयुक्त आणि अंतर कमी झाल्याने वाहतूक खर्चात भरीव बचत करणारे ठरतील, प्रामुख्याने फलटण तालुक्याच्या दक्षिण पट्टयातील काहीशा अविकसित भागाला वरदान ठरणाऱ्या या रस्त्यांची अनेक वर्षांची प्रलंबीत मागणी मान्य झाल्याने या भागासह फलटण व कोरेगाव तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत असून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करणारे जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांचे अभिनंदन होत आहे.
दोन्ही घाट रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेसह भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याने तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्टयाला धोम – बलकवडी धरणानंतर लाभलेले हे दुसरे वरदान असल्याचे पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.