स्थैर्य, सातारा, दि. ०४ : दुष्काळी परस्थितीत चालविलेल्या चारा छावणीची प्रलंबीत बिले तातडीने देण्यात यावीत अशी मागणी हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. दुष्काळी परस्थितीत पशुधन जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छावण्या चालविण्यात आल्या होत्या. यामध्ये माण, खटाव, फलटण या तालुक्यात चारा छावण्यांची संख्या जास्त होती. यापैकी 50 टक्के छावण्यांना हरणाई सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. छावण्या बंद होवून आठ महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप शासनाने दोन महिन्याचे अनुदान दिले नाही.
सातारा जिल्ह्यातील छावण्यांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना छावणी चालकांची बिले अडकवून ठेवल्यामुळे नाहक त्रास होत आहे. दोन महिन्याचे अनुदान रखडल्यामुळे अनेकांची पशुखाद्य व चार्याची बिले देणे बाकी आहे. तर काही चालकांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते. आता सावकारांच्याकडून भरमसाठ व्याजासह पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे चारा छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. निवेदन देतेवेळी रा.स.प.चे मामूशेठ वीरकर, मृणाल पाटील, विक्रमादित्य देशमुख, डॉ. अजित दडस, निलेश घार्गे आदी उपस्थित होते.