दैनिक स्थैर्य । दि. २९ जून 2021 । फलटण । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात प्रशासनाकडून संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत काल दि.28 रोजी एका दिवसात रुपये 52 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
फलटण उपविभागीय अधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप व फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील प्रमुख चौकात नाकाबंदी पॉईंट नेमून पोलीस विभाग, महसूल विभाग, नगरपालिका विभाग यांनी संयुक्तरित्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, आस्थापना तसेच विनाकारण फिरणारे नागरिक यांच्यावर दि.28 रोजी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. यामध्ये विनाकारण फिरणार्या 17 जणांकडून रु.8 हजार 500, विनामास्क फिरणार्या 11 जणांकडून रु. 2 हजार 200, आदेशाचे उल्लंघन करणार्या 4 आस्थापनांकडून रु.19 हजार 500 आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या 96 प्रकरणात रु.22 हजार अशी एकूण रु.52 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण कोणीही बाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन फलटण शहर पोलीसांच्यावतीने पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.