
स्थैर्य, कराड, दि.१७: येथील भेदा चौकातील इंडसइंड बँकेसमोर एसटीच्या धडकेत पादचारी महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 8.40 वाजणेच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद आस्लम आप्पासो मकानदार यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सखुबाई सिताराम शिंदे (रा. रोहीदासनगर, उंब्रज, ता. कराड) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. दिपक शिवाजी ताटे (वय 34, रा. बांबवडे पुदेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा नोंद झालेल्याचे एसटी चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी 8.40 च्या दरम्यान शनिवार पेठ येथील भेदा चौकात इंडसइंड बँकेसमोर एसटी क्रमांक (एम. एच. 14 बीटी 3713) हिच्यावरील चालक दिपक साठे याने त्याच्या ताब्यातील एसटी भरधाव वेगात हयगयीने निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभी असलेली पादचारी महिला सखुबाई शिंदे यांना जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन मयत झाल्या. याबाबत शहर पोलिसात एसटीचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरोळे करीत आहेत.