स्थैर्य, सातारा, दि. १२ : सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये माणसांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. मात्र निसर्ग आणि या निसर्गातल्या मुक्त संचार करणाऱ्या पशुपक्ष्यांना मात्र कोणताच धरबंध नाही. याचेच प्रत्यंतर आज रविवारी सकाळी सातारावासियांना अनुभवता आले. सध्या टाळेबंदी मुळे सकाळी नऊ ते दोन या वेळेतच सर्व व्यवहार सुरु असल्यामुळे शहराच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या यवतेश्वरच्या डोंगर कपारीत असलेले अनेक मोरांचे वास्तव्य आता अन्न शोधण्यासाठी या भागातून शहराकडे येऊ लागले आहेत. मोरेवाडी. अरे भागातून हे मोर आज सकाळी शुक्रवार पेठेतील जलमंदिरातून चक्क राजवाड्याच्या छतावर आलेले पाहायला मिळाले.
सध्या राजवाडा येथील जिल्हा न्यायालय, मराठा आर्ट गॅलरी व काही सहकारी संस्थांची कार्यालय गेली अनेक वर्ष बंद असल्यामुळे हा राजवाडा सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या परिसरात माणसांचा वावर कमी असल्यामुळे हे दोन मोर छतावर नाचताना पाहायला मिळाले.
राजवाडा चौपाटी पुढील मैदानात या मोरांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो सातारकर एकमेकाला बोलावून बोलावून हे दृश्य पाहण्यास सांगत होते. काही मिनिटांच्या या निसर्गरम्य दर्शनानंतर पुन्हा हे मोर राजवाड्यांच्या छतावरून आतील भागात निघून गेले, त्यामुळे सातारकरांना अगदी राजवाड्यासारख्या गजबजलेल्या वस्तीत ही या पक्षीराज मोराचे दर्शन आज अनुभवता आले.