दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । सांगली । देशात इतर राजकीय पक्षांनी जातीयवादी भूमिका घेत समाज मनावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा (दक्षिण) विभागाच्या वतीने सांगली शहरात शांतता मार्चचे आयोजन करण्यात येवून यात वंचित बहुजन आघाडीचे तालुका व शहर पदाधिकारी,कार्यकर्ते सामील झाले.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा प्रकाश आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजात दूही माजवणाऱ्या व त्यातून आपल्या स्वार्थासाठी भोंगा,हनुमानचालिसा पठण या सारख्या धार्मिक विषयावर बोलून राजकीय पोळी शेकणाऱ्या पक्षांच्या भूमिकांमुळे व्यथित शांतता प्रिय लोकांच्या मनात,येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदर शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यात कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा चेथावनीखोर घोषणा न देता हा शांतता मार्च लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करत संविधान प्रास्ताविकेचे सामुहिकपणे वाचन करून मार्चची सांगता करण्यात आली.
यावेळी सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे,जिल्हा युवक अध्यक्ष राजुभाई मुल्ला, डॉ. रवींद्र विभुते, प्रमोद मल्लाडे, मानतेश कांबळे, संजय संपत कांबळे, आयुब बेलीफ,आप्पासो अजेंटराव, संदीप कांबळे, सुभाष पाटील, जितेंद्र साळुंखे, बजरंग चंदनशिवे, राहुल कांबळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.