दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भारताच्या स्वदेशी पेटीएम पेमेण्ट्स बँकेने आज घोषणा केली आहे की, बँक ई-रूपी वाऊचर्ससाठी ऑफिशियल संपादन सहयोगी आहे, ज्यामुळे देशभरातील ऑफलाइन स्टोअर्समध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. बँकने भारताची आघाडीची डिजिटल पेमेण्टस् व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडसोबत सहयोग केला आहे, ज्यामुळे कंपनीच्या प्रबळ व्यापारी समूहाला लाभ होईल. यासह व्यापारी आणखी एका डिजिटल पेमेण्ट कलेक्शन पद्धतीसह सक्षम होतील, जी त्यांना त्यांची डिजिटल उपस्थिती वाढवण्यामध्ये आणि अधिकाधिक ग्राहकांशी संपर्क साधण्यामध्ये मदत करेल.
ई-रूपी हा भारत सरकारचा उपक्रम कॅशलेस प्रीपेड वाऊचर आहे. लाभार्थींना एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून हे वाऊचर मिळू शकते. पेटीएमचे व्यापारी सहयोगी त्यानंतर ते वाऊचर स्कॅन करून देय रक्कम प्रविष्ट करू शकतात आणि प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये पेमेण्ट प्राप्त करू शकतात. यामुळे लाभार्थींना (युजर्स), तसेच डिजिटल पेमेण्ट्सच्या सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी औपचारिक बँकिंग सेवा किंवा स्मार्टफोन्स उपलब्ध नसलेल्या व्यक्तींना देखील या सुविधेचा लाभ मिळेल.
पेटीएम पेमेण्ट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश गुप्ता म्हणाले, “आमचा सतत देशातील वंचित व सेवा न मिळू शकणा-या लोकांना डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ई-रूपी वाऊचर्सच्या स्वीकारासह देशभरातील व्यापारी कॅशलेस पेमेण्ट्सना चालना देऊ शकतील, ज्यामुळे सरकारच्या अधिकाधिक भारतीयांना डिजिटल अर्थव्यवस्थेची ओळख करून देण्याच्या ध्येयाला अधिक चालना मिळेल.”
पीपीबीएल व्यापा-यांना ई-रूपी वाऊचर्स स्वीकारण्यास सक्षम करत आहे, जे मोठ्या युजरवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी देते आणि हा या उपक्रमाचा मोठा फायदा आहे. यामुळे अधिकाधिक व्यापा-यांना कॅशलेस व्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि परिणामत: डिजिटल पेमेण्ट्समध्ये वाढ होईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकतेच सरकारने जारी केलेल्या ई-रूपी वाऊचर्सचे भांडवल १०,००० रूपयांवरून प्रतिवर्ष १ लाख रूपयांपर्यंत वाढवले आणि लाभार्थींना संपूर्ण रिडिम होईपर्यंत वाऊचर अनेक वेळा वापरण्याची सुविधा दिली.