जावलीतील नुकसानग्रस्त पिकांची आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत केली पाहणी |
स्थैर्य, सातारा, दि.२२: अतिवृष्टीमुळे सातारा- जावळी तालुक्यात झालेल्या पिकनुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत थेट शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात जावून पाहणी केली. दोघांनी भात, सोयाबीन, भुईमूग आदी नष्ट झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची गाऱ्हांनी ऐकून घेतल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कर्जमाफी व इतर गोष्टी नंतर कराच पण आधी सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे असे सांगितले. यावर शेतकरी बांधवांनो तुम्हांला जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन ना. दरेकर यांनी दिले.
ना. दरेकर, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह भाजप पदाधिकारी, महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकारी यांनी जावळी तालुक्यातील रिटकावली, बिभवी आणि सातारा तालुक्यातील गजवडी, कारी, सोनवडी आदी परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात झालेल्या पीक नुकसानीची सविस्तर माहिती ना. दरेकर याना दिली. तसेच आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. कोरोना महामारीत फक्त शेतकऱ्यांमुळे सर्वांना खायला अन्नधान्य मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यावर ना. दरेकर म्हणाले की, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठाकरे सरकारने सरसकट प्रत्येक बाधीत शेतकऱ्यांना दहा ते १५ हजार रूपये तातडीची मदत द्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी रसत्यावर उतरेल. होणाऱ्या परीणामाला सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील नुकसान ग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायत साठी ५० हजार व फळबाग लागवडी साठी १ लाख रूपये द्यावे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा राज्यभर भारतीय जनता पार्टी जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत ,नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होवू नका, आम्ही तुम्हांला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही ना. दरेकर यांनी यावेळी दिली.