
दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । फलटण । जिल्हा बँकेच्या वेळेवर कर्ज परत फेड योजनेचा लाभ, वीज बिल, घरपट्टी, पाणी पट्टी, शेतसारा वगैरे भरणा करण्यासाठी सध्या शेतकरी प्रामुख्याने ऊस पेमेंटवर अवलंबून असल्याने फलटण तालुक्यातील ऊसाचे गाळप करणाऱ्या तालुक्यातील व बाहेरच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट २०/२५ मार्च पूर्वी द्यावे अशी मागणी डॉ. शिवाजीराव गावडे यांनी केली आहे.
फलटण तालुक्यातील ऊसाचे गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांपैकी श्रीरामने दि. १५ फेब्रुवारी अखेर, माळेगावने दि. ३१ जानेवारी अखेर, शरयूने दि. १५ जानेवारी अखेर, स्वराजने दि. १० फेब्रुवारी अखेर गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट केले असल्याचे नमूद करीत ऊस गाळपास आल्यापासून १५ दिवसात एफ आर पी ची संपूर्ण रक्कम आदा करणे बंधनकारक आहे, हा झाला नियम त्याप्रमाणे काहींनी पेमेंट केले आहे, स्वराजने तर आज अखेर पेमेंट केले असल्याने ऊस उत्पादक समाधानी आहे, तथापी मार्च अखेरीस वर नमूद केलेली सर्व देणी देण्यासाठी ऊस उत्पादकांना पैशाची असलेली गरज ओळखून पेमेंट करावीत अशी मागणी डॉ. शिवाजीराव गावडे यांनी केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज मुदतीत परत केले तर त्यावर व्याज आकारले जात नाही तो मोठा लाभ मिळण्यासाठी ऊसाची पेमेंट मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. गावडे यांनी व्यक्त केली आहे.