दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । मुंबई । 7 वा वेतन आयोग प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री, वित्त मंत्री, कामगार मंत्री, मुख्य सचिव, तसेच सामान्य प्रशासन राज्यमंत्री, सचिव यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन हे कायम कर्मचारी पेक्षा खूप कमी असते. अशात कुटुंब चालवणे अवघड होते. ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने 7 वा वेतन आयोग राज्यात लागू केला आहे. त्याअर्थी राज्यातील तमाम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा 7 वा वेतन आयोग प्रमाणे मानधन देणे आवश्यक आहे. राज्यात विविध शासकीय / निम शासकीय कार्यालयात आस्थापने वरील कंत्राटी, बाह्यस्त्रोत कंत्राटी, मानधना वरील कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याबाबत आम्ही गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करतोय. न्याय हक्कासाठी लढत आहोत. संपूर्ण राज्यात 03 लाख पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायती पर्यंत सर्व विभागात मागील 01 ते 20 वर्षांपासून काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. ज्याअर्थी समान काम, समान वेतन असा आपला नियम आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्याना देखील 7 वा वेतन आयोग प्रमाणे वेतन मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग प्रमाणे शासकीय व निम शासकीय आस्थापने वरील कंत्राटी, बाह्यस्त्रोत कंत्राटी, मानधना वरील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.
सदरहू निवेदन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, सामान्य प्रशासन राज्यमंत्री, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, कामगार विभाग प्रधान सचिव व कामगार आयुक्त यांना देखील देण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मुकुंद जाधवर, सरचिटणीस शहाजी नलवडे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, महिला राज्याध्यक्ष माधुरी थोरात, सह चिटणीस प्रशांत गायकवाड, प्रमोद अहिरराव, राज्य उपाध्यक्ष विलास भोसले, इंजि. राजेंद्र बुरांडे, राज्य महिला उपाध्यक्ष अरुणा काकडे, राज्य उपाध्यक्ष मनोजकुमार म्हस्के, ओंकार जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.