फलटण नगरपालिकेत काम न करताच बिले अदा; मुख्याधिकाऱ्यांसह अन्य दोषींवर कारवाई करा; भारतीय जनता पार्टीची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामधील विविध रस्त्यांची कामे न होताच त्या रस्त्यांची बिले काढण्याचे काम फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तरी याबाबतीत आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढा देणार आहे. ही कामे न होता बिले काढण्याचे काम ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यामध्ये मुख्याधिकारी असो किंवा अन्य कोणी असो, अश्या सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली.

भारतीय जनता पार्टीच्या फलटण तालुका कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी अनुप शहा बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच झालेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुराव्यानिशी फलटण नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येत आहे. फलटण शहरामधील विविध विकास कामे न करता फक्त त्यांची बिले काढून घेण्याचे काम फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून गेले काही वर्ष सुरू आहे. नगरपालिकेमधील सत्ताधारी व प्रशासन यांच्या संगनमताने शहरांमधील विविध रस्त्यांसह विविध विकास कामांची बिले थेट काढण्याचे काम करण्यात आलेले आहे. याबाबत पुराव्यानिशी आपण लढा देणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरामध्ये बहुतांश ठिकाणी रस्त्याचे काम न करता त्याची बिले काढण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही माहिती घेतली असता आता पुरावे नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आता रस्त्याचे काम सुरू करण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. आत्ता संबंधित कामाची वर्क ऑर्डर नसताना काम सुरू केलेले आहे याबाबत सुद्धा आम्ही पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरांमधील रस्त्याची जी दयनीय अवस्था झालेली आहे. ती फक्त आणि फक्त सगुणामाता कन्स्ट्रक्शन माध्यमातून झालेली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तक्रार दिली असता आम्हाला हस्ते परहस्ते धमकी देण्याचे काम करण्यात आले. परंतु खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करत असल्याने अशा कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची निवृत्ती जवळ आल्याने ते आता पूर्ण ताकतीने काम करत नाहीत. फक्त आणि फक्त टक्केवारीसाठीच ते काम करत आहेत. फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करण्याचे काम नगरपालिकेमध्ये सुरू आहे. परंतु आता नगरपालिका प्रशासनाने सुद्धा एक लक्षात घेणे गरजेचे आहे. आता राज्यांमध्ये तीन चाकी सरकार नाही व सभापती पद सुद्धा नाही त्यामुळे काम करत असताना भान ठेवूनच काम करावे, असेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले.

शहरातील सोमवार पेठ येथील नागरिक राहत असलेली जागा ही खुली आहे, असे दर्शवून त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु या ठिकाणी गेली 40 वर्षाहून अधिक वर्षे सर्वसामान्य नागरिक हे वास्तव करीत आहेत. याबाबत नगरपरिषदेच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या क्रीडांगणाबाबत आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा गैरुपयोग भारतीय जनता पार्टी करू देणार नाही व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना सुद्धा कोठेही जावे लागणार नाही. तेथील नागरिक हे आहे तिथेच राहणार, असेही यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरामधील सातारा रोड पासून अगदी जुना डीएड कॉलेज चौक, पृथ्वी चौक या ठिकाणी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अथवा नगरपालिकेतील कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने दुचाकी वर व्यवस्थित जाऊन दाखवावे. फलटण शहरातील या रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण शहरातील प्रभाग निहाय जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी आपले कोणतेही प्रश्न असले तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!