
स्थैर्य, फलटण, दि. ८ : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना गेल्या चार महिन्यापासून बंद असलेल्या बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला उठाव नाही. फळे व भाजीपाला अक्षरश: रानात सोडून द्यावा लागला आहे. अश्या परिस्थिती मध्ये फलटण पूर्व भागातील पवारवाडी ता. ता.फलटण सचिन उर्फ बाबा वरे यांच्या कलिंगड व टरबूजाचे तर आसू येथील शिवाजीराव शेडगे यांच्या कोबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील अनेक शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबा वरे या युवकाने जानेवारी महिन्यात ८० गुंठायात नॉन यु सीड कंपनीचे अत्यंत गोड, चवदार, शुगरकेन, आरोही, विशाला (रंगीत वाण) अशी आठ प्रकारची कलिंगड व टरबूजाची लागवड केली. अनमोल, सरस्वती, विशाल, आरोही आदी जातीचे दोन एकरात लागवड करून दोन लाख रुपये खर्च केला. दि. २२ मार्च रोजी ही फळे तोडणीला आली आणि दुर्दैवाने कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन केला गेला. त्यामुळे त्यांना देशी विदेशी बाजारपेठ मिळू शकली नाही.
बांधावर विक्री करूनही भांडवलही निघाले नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र खचून न जाता लॉकडाऊन जूनमध्ये उठेल अशा आशेने आणि किमान भांडवल तरी मिळावे या उद्देशाने त्यांनी त्याच गादी वाफ्यावर पुन्हा कलिंगडाची लागवड केली. जूनमध्येही लॉकडाऊन उठले नसल्याने पुन्हा बाजारपेठे अभावी घोर निराशा झाली. सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे वरे सांगतात. यावेळेस मात्र त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच बारामती, फलटण शहरातील चौकाचौकात फळे विकण्याचा संकल्प केला आणि त्याची सुरूवातही गेल्या तीन दिवसापासून केली आहे.परंतु आधुनिक पध्दतीच्या या कलिंगडाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्याकडे सर्वसाधारण वरून हिरवे आणि आतून लाल असलेले कलिंगड खाणे अंगवळणी पडले आहे. त्यामुळे वरून काळ्यापाटीचे आणि आतून पिवळे तर वरून पिवळे आणि आतून लाल असलेल्या आधुनिक पध्दतीचे कलिंगड घेण्यास गाहक सहजासहजी धजावत नाहीत. विदेशी लोक त्याच्या चवीमुळे अशी आधुनिक फळे खाणे पसंत करतात हे पटवून द्यावे लागत आहे. त्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे बाबा वरे सांगतात. अश्या प्रसंगातही त्यांची किमान गुंतवलेले भांडवल तरी मिळावे यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. यातून त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.
पवारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर पवार, तलाठी सगभोर अण्णा, कृषी सहाय्यक धैर्यशील पाटील, संजय वरे, दिप वरे यांनी फलटण येथील डी.एड.कॉलेज चौक, गिरवी नाका येथे जाऊन सचिन वरे यांच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले. आसूचे शिवाजीराव शेडगे यांनी ऊसाच्या एक एकरात आंतरपीक म्हणून कोबीचे उत्तम पिक घेतले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही कोबीला बाजारपेठे अभावी उठाव मिळाला नाही. परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेडगे यांनीही आपला संपूर्ण एक एकराचा प्लॉट रोटर करून जमिनीत गाडला. त्यांचेही सुमारे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रमाणे गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठे अभावी नुकसान झालेल्या व अडचणीतील शेतकऱ्यांची सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे.