
स्थैर्य, मुंबई, दि.२: मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे मत सोशल मीडियावर गुरुवारी व्यक्त केले. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात अपयश आल्याची टीका आघाडी सरकारवर होत असतानाच पार्थने अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो टाकून सोशल मीडियावर पोस्ट टाकली. ‘विवेकने आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला खाक करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही,’ असे पार्थने म्हटले आहे. लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असे सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचे ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जागे व्हावे आणि आरक्षणासाठी लढायला हवे, अशी सूचना पार्थने केली आहे.
मुलाच्या भूमिकेला अजित पवारांची मूकसंमती असल्याची चर्चा
– संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे दोन्ही छत्रपती भाजपकडून खासदार झाले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच मार्गी लावावा असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात लगावला होता. पण आजोबांच्या विरोधात जाऊन पार्थने मराठा आरक्षणप्रश्नी सरकार कमी पडल्याचे म्हटले आहे.
कृषी विधेयकावर अजित पवारांची वेगळी भूमिका
केंद्राच्या कृषी विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका तळ्यात-मळ्यात असताना अजित पवारांनी ही विधेयके महाराष्ट्रात लागू करणार नाही असे जाहीर करून पक्षाची गोची केली होती. नंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संमतीनेच कृषी विधेयकांचा अध्यादेश ऑगस्ट महिन्यातच जारी करण्यात आल्याचे उघड झाले त्यामुळे पक्ष तोंडघशी पडला. अखेर या विधेयकांच्या अंमलबजावणीसाठी उपसमिती स्थापन करण्याचा मार्ग काढून हा प्रश्न तात्पुरता पुढे ढकलण्यात आला.
यापूर्वी फटकारले होते आजोबांनी
सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करून पार्थ यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणले होते. त्यानंतर नातवाच्या मताला कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगून आजोबा शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे फटकारले होते. त्या वेळी पवार घराण्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते.
आजोबा शरद पवारांच्या भूमिकेविरोधात पुन्हा जाहीर मतप्रदर्शन
– गुरुवारी पार्थ यांनी सोशल मीडियावर पक्षविरोधी मत व्यक्त केल्याने पवार कुटुंबीयांतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असून पार्थच्या मनातील लोकसभा पराभवाची सल गेली नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
– मराठा नेत्यांनी आरक्षणप्रश्नी एकत्र येण्याची सूचना पार्थनी केली असून पार्थ यातून मराठा कार्ड वापरत असल्याचे म्हटले जात आहे.
– सुशांतसिंह आत्महत्या तपास प्रकरण आणि राम मंदिर भूमिपूजनप्रश्नी पार्थने दिलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेली होती. तोच कित्ता पुन्हा गिरवला आहे.
– मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घातले पाहिजे, अशी मागणीही पार्थने केली. पार्थच्या या मतांना त्याचे पिता व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मूकसंमती असल्याचे सांगितले जाते.
कार्यकर्ते संभ्रमात: राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवाय अर्थ खाते ते गृह खात्यापर्यंतची महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. असे असताना आजोबा शरद पवार यांच्या भूमिकेविरोधात मत व्यक्त करून पार्थ पवार यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.