दैनिक स्थैर्य | दि. १५ डिसेंबर २०२४ | फलटण |
कर्मवीरअण्णांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावून त्याचा वटवृक्ष केला; परंतु पवारसाहेबांनी त्या वटवृक्षाला आधुनिक शिक्षणाची जोड दिली. विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य असल्याचे त्यांनी जाणले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आय. टी. तज्ज्ञ व सुप्रसिद्ध लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मुलींचे लोणंद येथील प्रांगणात पद्मविभूषण मा. खा. शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रयत संकुल यांच्या वतीने अभीष्टचिंतन समारंभाचे आयोजन शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. शिकारपूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. सभापती समाजकल्याण जि.प.सातारा मा. आनंदराव शेळके-पाटील होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शिकारपूर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पवारसाहेबांच्या कष्टाचे संस्कार आपणामध्ये रुजविले पाहिजेत. विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत. जन्म कोठे झाला याला महत्त्व नसते, तर कर्तृत्वाला महत्त्व असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ज्ञान आहे. त्यांनी आपल्यातील न्यूनगंड दूर करणे आवश्यक आहे. संघर्ष केल्यावर यश नक्की मिळते. जीवनात कौशल्याची गरज असते, ते कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करावे. तंत्रज्ञानाच्या युगात गुणापेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व आहे. इंग्रजी व जपानी भाषा शिकणे गरजेचे आहे. आज जगामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण, हे तंत्रज्ञान कसे वापरावे याचे शिक्षण गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मकतेसाठी केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता आणि महत्त्वाकांक्षा आवश्यक असते.
डॉ. शिकारपूर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पवारसाहेबांच्या जीवनकार्याचा, चरित्राचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. पवारसाहेबांचे रयत शिक्षण संस्थेला ‘रोल मॉडेल’ करण्यात मोलाचे योगदान आहे.
मिलिंद माने मनोगतात म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा मोलाचा वाटा आहे. कर्मवीरअण्णांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे रयत शिक्षण संस्था हे ज्ञानाचे मंदिर निर्माण केले. या मंदिरावर कळस पवारसाहेबांनी चढविला.
सुनील शहा स्वागतपर भाषणात म्हणाले, शैक्षणिक गुणवत्तेसाठी पवारसाहेबांची आग्रहाची भूमिका होती. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबविले.
चंद्रकांत ढमाळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पवारसाहेब सामाजिक आणि वास्तवतेची जाण असणारे कुशल संघटक आहेत. पवारसाहेब लहानपणापासूनच धाडसी व्यक्तिमत्व होते.
यावेळी व्यासपीठावर जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मिलिंद माने, महाविद्यालय विकास समिती सदस्य हणमंत शेळके, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सत्वशील शेळके, अनिल कुदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील शहा, प्रसन्न शहा, अविनाश देशमुके, प्राचार्य चंद्रकांत जाधव, प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे, बागवान सर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणंद येथील गुळाचे व्यापारी राजकुमार व्होरा यांनी रयत संकुलाच्या विकासासाठी दोन लाख रुपये देणगी दिली.
प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंदचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी करून दिला.
कार्यक्रमास लोणंद परिसरातील रयतप्रेमी, हितचिंतक, मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एम. डी. नायकू, प्रा. पायल घोरपडे यांनी केले.
आभार प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे यांनी मानले.