
स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : फलटण शहरातील पवार गल्ली येथे महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने ‘नवरात्र उत्सव २०२५’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मंडळाचे हे केवळ तिसरे वर्ष असले, तरी त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमांना नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद मिळत आहे.
या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दररोज सायंकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांची होणारी गर्दी. यंदाच्या उत्सवात ‘जय तुळजाभवानी दांडिया ग्रुप’च्या सादरीकरणामुळे कार्यक्रमांची रंगत वाढत आहे. यासोबतच, मंडळातर्फे ‘माहेरवाशीन महिलांचा सन्मान’ हा विशेष उपक्रम राबवत त्यांची ‘खणा-नारळाने ओटी’ भरली जात आहे. लहान मुलांसाठी गायन व नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जात असून, विजेत्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे बक्षीसही दिले जात आहेत.
दरम्यान, येत्या सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी महिलांसाठी लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ (खेळ पैठणीचा) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कलाकार शेखर ओहाळ यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक सचिन गानबोटे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, अधिकाधिक महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

