श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलमधून रूग्णांना चांगली सेवा मिळेल – पालकमंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांगली, दि. १८: सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा अडचणीच्या काळात जैन समाज व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटल, सांगली येथे अत्यंत कमी वेळेत उभे केले. या हॉस्पिटलमधून कोविड रूग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

नेमिनाथनगर, सांगली येथे श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, भालचंद्र पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ऑक्सिजन निर्मितीची क्षमता मर्यादित असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नागरिकांनी घरी राहून कोरोनापासून सुरक्षित रहावे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाली तर अनेक प्रश्न आटोक्यात राहतील. श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलची क्षमता 75 बेड्सची असून प्रारंभी अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त अशा 35 बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 15 बेड्स आयसीयु व्हेंटिलेटर व हायफ्लो नेझलयुक्त तसेच 20 ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केल्याचे ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रम प्रसंगी रूग्णसेवेच्या कार्याबद्दल डॉ. दिनेश बभान, डॉ. राहुल पाटील, ऑक्सिजन विभागातील कार्याबद्दल सुनील कोथळे, इलेक्ट्रीक विभागातील कार्याबद्दल रमेश खोत व फर्निचर विभागातील कार्याबद्दल महादेव धुमाळ, अमोल चौगुले यांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम असून रूग्णांसाठी शुध्द शाकाहारी मोफत भोजन व्यवस्था तसेच अर्चना मुळे यांच्याव्दारे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून या हॉस्पिटलसाठी दानशुर व्यक्तींनी 75 लाखांची अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य साधन दान स्वरूपात देवून बहुमोल योगदान दिल्याचे त्यांची सांगितले. सूत्रसंचालन प्रसन्ना शेटे व धन्यकुमार शेट्टी यांनी केले तर आभार राजगोंडा पाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!