
स्थैर्य, सांगली, दि.२४: होम आयसोलेशनमधील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी नियमांचे पालन करायला हवे. गावा-गावातील रुग्ण संख्या कमी करायची असेल तर रुग्णांनी स्वतः अलगीकरण कक्षात दाखल व्हावे. यातून कोरोनाचा प्रसार थांबेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी वाळवा व बागणी येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी आष्टा शहर, बागणी, वाळवा,नवेखेड या गावांना अचानक भेटी देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस व गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील गावनिहाय आढावा मांडला.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा येथे नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या अलगीकरण कक्षाची पाहणी केली. या प्रसंगी उपसभापती नेताजी पाटील, देवराज पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, वैभव शिंदे, झुंजार पाटील, विराज शिंदे, बाळासाहेब पाटील, तहसीलदार रविन्द्र सबनीस, संग्रामसिंह पाटील, माणिक शेळके, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक सिद्ध, वर्धमान मगदूम, अर्जुन माने, एल. बी. माळी, सतीश माळी, विष्णू किरतसिंग, शिवाजी चोरमुले आदी उपस्थित होते.

