पाथरपुंज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर झळकवणार

शंभूराज देसाई; पर्यटनाचे हब बनवण्याचा व्यक्त केला संकल्प


स्थैर्य, सातारा, दि. 18 सप्टेंबर : देशातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गाव आता पर्यटनाच्या जागतिक नकाशावर झळकणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाथरपुंजला ’पावसाची राजधानी’ ही ओळख देत ते गाव पर्यटनाचे हव बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

देवगड, चेरापुंजीसारखी ठिकाणं जागतिक पातळीवर ओळखली जातात. पणपाथरपुंज येथे पावसाची सर्वाधिक नोंद होते. दुर्गम भागातील पावसाच्या या गावाला पर्यटनाची पंख लावून जागतिक नकाशावर नेणं, हा माझा संकल्प आहे. पाथरपुंजमध्ये पडणार्‍या प्रचंड पावसामुळे या गावानेही विक्रम रचला आहे. यंदा 1 जून ते आजअखेर या मान्सून हंगामात पाथरपुंजमध्ये तब्बल 7205 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर त्याच काळात प्रसिद्ध चेरापुंजीत फक्त 3975 मिलिमीटरपावसाची नोंद झाली. या आकड्यांतून पाथरपुंजचे पावसाळी वैभव जगासमोर आणण्याची वेळ आली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

पाथरपुंज गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने पर्यटकांना सहजप्रवेश मिळणं अवघड आहे. मात्र, इको फ्रेंडली गाड्यांचा पर्याय, नियोजित मार्गदर्शन आणि नियंत्रित प्रवेश यावर वन विभागासह पर्यटन विभाग काम करणार आहे. ’जून ते ऑगस्ट या अडीच महिन्यांत पाथरपुंजचा पाऊस अनुभवणं, निसर्गाचा आनंद घेणं आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव चाखणं- ही एक दिवसभराची ट्रीप ठरू शकते. सकाळी पाथरपुंजला पोहोचून संध्याकाळी परतणं हेही पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणठरू शकतं,’ असे देसाई यांनी सांगितले.

या संदर्भात प्राथमिक बैठका पूर्ण झाल्या असून ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या पुढील बैठकीत अंतिम नियोजन ठरवले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन विकासासाठी नेहमीच आग्रही असतात.त्यामुळे वन विभाग व पर्यटन विभाग संयुक्तपणे प्रारूप तयार करून सरकारसमोर मांडणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!