
स्थैर्य, फलटण, दि. 10 सप्टेंबर : फलटण शहराला माण-खटाव तालुक्याशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण फलटण-दहिवडी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, त्याच्या आराखड्यानुसार रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नवीन रस्ता एकूण १६ मीटर (अंदाजे ५२.८ फूट) रुंदीचा असणार आहे. यामध्ये रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी ८ मीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्त्यामध्ये दुभाजक (Divider) असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फलटण-दहिवडी रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे हा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होण्यास मदत होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.