
दैनिक स्थैर्य । 20 एप्रिल 2025। सातारा। महाराष्ट्र राज्याचे पाहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात शनिवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुहाचे प्रमुख राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून गत दहा वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेचे हे नववे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील हजारों जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी 08.30 वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व गौरवयात्रा दोन वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.
लोकनेत्यांच्या सुनबाई आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांच्यासह लोकनेत्यांची चौथी पिढी असलेली यशराज देसाई, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही 23 एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि.20 पासून 23 एप्रिल पर्यंत कारखाना कार्यस्थळावर पारायण सोहळा संपन्न होत आहे. गत दहा वर्षापासून मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या आदल्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देणेकरीता त्यांच्या कार्याचा चित्ररथ याची गौरवयात्रा व गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा संपन्न झाला. तालुक्यातील तब्बल 22 गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रेने मार्गक्रमण केले. यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित राहून गौरवयात्रेचे आदरपूर्वक स्वागत केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी, फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.
तालुक्यातील दौलतनगर कारखाना,
गव्हाणवाडी, चोपदारवाडी, सूर्यवंशीवाडी, पापर्डे, मारूल हवेली, गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवडी, वेताळवाडी, नावडी, निसरेगांव, निसरे फाटा, आबदारवाडी, गिरेवाडी, मल्हारपेठ, कदमवाडी, नारळवाडी, येराडवाडी, नवसरी, नाडे, आडुळ, येरफळे, म्हावशी, पाटण, तसेच पाटण पंचायत समिती असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण सुमारे 22 गावातून मार्गक्रमण करणा-या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले. या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करणारे बॅनर पालखी सोहळयाच्या मार्गावर लक्ष वेधून घेत होते. लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले होते.यामुळे पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या अनोख्या मिरवणूकीची सांगता पाटण येथे मंत्री शंभूराज देसाई, यशराज देसाई मंत्री शंभूराज देसाई यांचे ओएसडी सुनील गाडे, प्रांताधिकारी सोपान टोमपे,तहसीलदार अनंत गुरव,यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो लोकनेते प्रेमी यांच्या उपस्थितीत , अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण..!
संपुर्ण मिरवणूकीमध्ये पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.याचवेळी ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येत होते.या अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी,नाश्ता,आईस्क्रीम अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
शासकीय योजनांची माहिती देणार्या चित्ररथांचा सहभाग..!
शनिवारी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने पाटण मधून याची सुरवात खर्या अर्थाने करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या कार्याचे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे दर्शन घडविणार्या चित्ररथा सहित राज्य शासनाच्या 26 विभागांकडील सुमारे 150 योजना व विकासकामांची माहिती देणारे चित्ररथ यागौरव यात्रेत सहभागी झाले .
यावेळी या गौरव यात्रेत विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी कर्मचारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यापासूनच्या पारायण कार्यक्रमात मंत्री देसाई उपस्थित राहणार..!
राज्याचे पर्यटन,खनिकर्म,आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उद्या दिनांक 20 पासून आपण प्रत्यक्ष पारायण कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई कार्यालयाकडून देण्यात आली आहे.