पाटणमध्ये ३० आणि ३१ मार्च रोजी भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन


वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी पाटण तालुक्यातील नाडे येथे ३० आणि ३१ मार्च रोजी दोन दिवसीय भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 स्थैर्य, पाटण, दि. २९ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सातारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने पाटण तालुक्यातील नाडे येथे दोन दिवसीय भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव सोमवारी (३० मार्च) आणि मंगळवारी (३१ मार्च) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांसाठी याठिकाणी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

उद्घाटक आणि मान्यवरांची उपस्थिती

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पाटण पंचायत समितीच्या सभापती सविता पवार आणि उपसभापती विजय पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष यशवंत पाटणे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

ग्रंथदिंडी आणि कवी संमेलनाची मेजवानी

सोमवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ग्रंथपूजन करून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात नामवंत कवींच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडेल. याशिवाय, दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार असून विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

परिसंवाद आणि समारोप

मंगळवारी सकाळी दहा वाजता ‘वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवाद होणार असून तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी विनोदी साहित्य वाचनाचा कार्यक्रम होईल. तर, समारोप सोहळ्यात नियमित वाचकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!