विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । नागपूर । भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतानाच 75 वर्षापूर्वी देशाच्या विभाजनामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस देशात विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात असून या माध्यमातून देशाच्या अखंडतेचे महत्त्व आपल्याला समजेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

नागपूर महानगरपालिका, अखिल भारतीय सिंधी समाज व जरीपटका दुकानदार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विभाजन विभीषिका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भरवण्यात आलेल्या छायाचित्र व माहितीपट प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सिंधी समाजातील मान्यवर उपस्थित होते. फाळणीमुळे घडलेल्या घटनांवर आधारित छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

यावर्षीपासून देशभर 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात आहे. याच दिवशी 75 वर्षांपूर्वी अखंड भारताचे तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळण्यात येत आहे. देशाची फाळणी भयावह ठरली आणि तिच्या परिणामांचे सर्वांना स्मरण राहावे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. देशात फाळणीचे पुन्हा बिजारोपण होणार नाही. यासाठी सर्वांना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर काम करायचे आहे. फाळणीच्या या जखमा खोलवर असूनही स्थलांतरितांच्या मेहनतीचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान, शान आणि अभिमान ठेवला पाहिजे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. त्यांच्या योगदानाचे मोठे महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी शाळेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींच्या हातातील फाळणीसंदर्भातील वेदनांचे वर्णन असलेल्या फलकांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


Back to top button
Don`t copy text!