लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी वंचित समाजाचा सहभाग महत्त्वाचा – साहित्य संमेलन परिसंवादातील वक्त्यांचा सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । लोकशाही ही समाजातील विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने समृद्ध होत असते. परंतु अजूनही वंचित समाजातील काही घटकांचा सहभाग पूर्णपणे झाला असल्याचे दिसत नाही. यासाठी या घटकातील व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवून त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आचार्य विनोबा भावे सभामंडपात ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीन प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात संवादक म्हणुन डॉ. दीपक पवार यांच्यासह बाळकृष्ण रेणके, दिशा पिंकी शेख, हर्षद जाधव, रझिया सुलताना, मुफीद मुजावर वक्ते म्हणून सहभागी झाले होते. व्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

सुरुवातीस डॉ.देशपांडे यांनी मतदार होणे लोकशाहीची पहिली पायरी असल्याचे सांगितले. बेघर, भटके विमुक्त, देहव्यवसायातील महिला, पारलिंगी या वंचित समाजातील घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लोकशाहीची संकल्पना अधिक मजबूत आणि दृढ करण्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. वंचित समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पारलिंगी कवयित्री असलेल्या दिशा पिंकी शेख यांनी सांगितले की, परंपरेने पारलिंगी समाजाची विशिष्ट प्रतिमा निर्माण केली आहे. ती प्रतिमा बदनामी करणारी आहे. अजूनही पारलिंगी व्यक्तीशेजारी कुणी बसायला तयार होत नाही. ही भावना अतिशय क्रूर आहे. 2014 पर्यंत साधे नागरिकत्वही आम्हाला मिळाले नव्हते. मी माझ्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. मलाही काहीतरी व्हावं वाटतं, त्यासाठीच लिहायला लागले. लेखणी आधुनिक काळातील मोठ शस्त्र आहे. हे शस्त्र समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते. पारलिंगी साहित्याची चांगली चळवळ भविष्यात उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी मुसलमान साहित्यातील अभ्यासक असलेल्या मुफिद मुजावर म्हणाले, राज्यातील मुसलमानांमध्ये सुफी आणि भक्ती परंपरेचा समावेश दिसतो. वारकरी, नाथ, दत्त परंपरेचा प्रभाव देखील दिसतो. पारंपरिक साहित्यात मुसलमानांची एकसाची प्रतिमा निर्माण झाली आहे. सय्यद अमिन यांनी अनेक चरित्र लेखन केले. शिवाजी महाराजांच्या चरित्रात त्यांनी महान उदारमतवादी शिवाजी राजनेता अशी मांडणी केली आहे. मुस्लीम साहित्यिकात अलिकडे सामुहीक स्वरुप आले आहे, असे मुजावर यांनी सांगितले.

हर्षद जाधव म्हणाले, पूर्वी अपंगांना गुप्त मतदान करता येत नव्हते. सहाय्यकाच्या मदतीने मतदान करावे लागत होते. सहाय्यकाला मात्र कुणाला मतदान केले ते कळत असत. ईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशीन मधील सुविधेमुळे आम्हाला गुप्त मतदानाचा अनुभव घेता येत आहे. अपंगांचे जीवन, जाणिवा, त्यांचा संघर्ष काही साहित्यिकांनी मांडला आहे. परंतु अजुन आणि अधिक स्पष्टपणे हा संघर्ष मांडण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक अपंग व्यक्ती आपल्या कार्यातून अपंगत्व भरुन काढण्याचा प्रयत्न करत असते. अपंगांच्या समाजात चांगल्या प्रतिमा निर्माण केल्या जाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आपल्या संबोधनात रझिया सुलताना म्हणाल्या की, समाजाचे सगळे प्रश्न कायद्याने सुटत नाही. यासाठी संवेदनशीलता देखील असावी लागते. मुसलमान तरुणांमध्ये अलीकडे चिंतनशिल आणि प्रश्न विचारणारी पिढी निर्माण झाली आहे. वाईट प्रथा, परंपरा बदलवायला सांगणारी ही पिढी आहे. प्रथम भारतीय नंतर मुसलमान ही भावना 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी रुजविली. पुढे अनेकांनी ही प्रथा पुढे चालविली. मुसलमान महिलांना वेगवेगळ्या प्रवाहाला बळी पडावे लागत आहे. परंतु सामाजिक अभिसरण देखील चांगल्या पध्दतीने होत असल्याचा आनंद आहे. सर्व अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम साहित्य करत आहे. अधिक संवेदनशील लिखानाने लोकशाही उच्च पातळीवर जात आहे.

भटक्या विमुक्त समाजासाठी दीर्घ काळापासून काम करीत असलेले बाळकृष्ण रेणके म्हणाले, चौकटी, चाकोरी बाहेर जावून वंचित घटकात आवश्यक लोकशाही रुजविण्यासाठी प्रचार प्रसाराचे काम निवडणुक आयोग करीत आहे. वंचित घटकात लोकशाही रुजवून देश बलवान करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. साहित्य म्हणजे समाजाचे वास्तव दाखविणारा आरसा आहे. ब्रिटीश काळात भटक्यांना बदनाम करणारे नकारार्थी साहित्य तयार केले गेले. दलित लेखकांची आत्मकथने त्यांच्या अस्मितेची तर भटक्या समाजातील व्यक्तींची आत्मकथने हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. आत्मकथने त्या त्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असते. वंचित समाजाच्या समस्या कशा सुटतील याचा संवेदनशिलपणे विचार केल्यास लोकशाही समृध्द होईल. भटक्या हा विकास प्रक्रियेतला अदृष्य समाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना विकासाची गोड फळे चाखण्याची संधी मिळावी, असे बाळकृष्ण रेणके यांनी पुढे सांगितले.

परिसंवादाचे संवादक डॉ.दीपक पवार यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. श्रोते, वक्ते व आयोजकांमध्ये संवादकांची उत्कृष्ट भूमिका त्यांनी पार पाडली. यावेळी श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेवटी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी आभार मानले. परिसंवादाला साहित्य रसिक, शिक्षक, विद्यार्थी, वंचित समाजातील अभ्यासक, वक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!