पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठीच्या या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात. ई-मेल करतांना विषयात स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा आवर्जून उल्लेख करावा, असेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत.

गीत, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असून, संस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावयायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिचे उदरनिर्वाहाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून जोपासत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये चार विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी तीन विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

घोषवाक्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये सात हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून, तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेले ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाच्या किंडल आवृत्तीची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!