दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । सातारा । विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८” जाहीर केले आहे. नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांच्या स्टार्टअप ची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील नव उद्योजकांचा आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे. नवकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्यातील परिसंस्था बळकट करणे. ही स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
ही स्टार्टअप यात्रा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक २० ऑगस्ट- वाई , खंडाळा , महाबळेश्वर ,खटाव, कोरेगाव, फलटण, दि. २२ ऑगस्ट – माण, सातारा , जावळी , दि. २३ ऑगस्ट – पाटण , कराड अशाप्रकारे सर्व तालुक्यांमध्ये येणार आहे. सदर तालुक्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय व गर्दीचे ठिकाणी अशा ठिकाणी मोबाईल वाहन थांबून वाहनसोबत असलेल्या प्रतिंनिधींद्वारे नागरिकांना या यात्रेबाबत माहिती नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात येईल.
तसेच दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सहभागी स्टार्टअप चे सादरीकरण सत्र (बूट कॅम्प अँड पिचिंग सेशन) होणार आहे. या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, सेवा, कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध नावीन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. पहिल्या तीन उत्कृष्ठ सादरीकरणास अनुक्रमे २५०००/-, १५०००/- , १००००/- पारितोषिक देण्यात येईल त्याचबरोबर त्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
नावीन्यतापूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी आपल्या नाविन्यतापूर्ण कल्पना उद्योगांबाबतचे अर्ज आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अथवा जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा (प्रशासकीय इमारत, तळ मजला, एस. टी. स्टँड च्या पाठीमागे, सातारा , ८३०८३८३६३७) येथे संपर्क साधावा किंवा अधिक माहिती साठी www.mahastartupyatra.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.