स्थैर्य, औरंगाबाद, दि. ७: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन किंवा नियम कठोर करण्यात आले. यामुळेच, औरंगाबाद जिल्ह्यामध्येही अंशतः लॉकडाउन लावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अधिष्ठाता कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सूंदर कुलकर्णी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आणि मनपा आरोग्य अधिकारी निता पाडळकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंत झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अशंत: लॉकडाउन असणार आहे. तर, प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. यादरम्यान प्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील इतर मोठी धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच, या काळात मास्क न घालणाऱ्यांवर आणि कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय, लॉकडाउन काळात मंगल कार्यालये 4 एप्रिल पर्यत बंद राहणार असून ज्याचे लग्न ठरले असतील त्यांना आता रजिस्टर मॅरेज करावे लागणार आहे. याशिवाच, जाहीर सभा, आठवडी बाजार, शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लास, क्रीडा स्पर्धा, स्विमिंग पूलदेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. तर, शहरातील मोठा बाजार असलेला जाधववाडी बाजार बुधवार पासून आठवडभर बंद राहणार आहे.
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे, होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यावर रुग्णालयात किंवा कोव्हिड सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल.