
स्थैर्य, मुंबई, दि. 27 : महाडमधील इमारत दुर्घटना ताजी असताना मुंबईतही आज एका इमारतीचा भाग कोसळला आहे. मुंबईतील नागपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे.
मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास नागपाडा भागातील एका इमरातीचा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली 4 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात करण्यात येते. तर या दुर्घटनेत तीन जणं जखमी आहेत.
यादुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे. 3 जणं जखमी असून त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, ही इमारत जुनी असून धोकादायक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच महाड येथे तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या इमारत दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दहा वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजाराची मदत देण्यात आली आहे.
मुंबईत जुलै महिन्यात फोर्ट परिसरात इमारत कोसळली होती. त्यानंतर मालाडमध्येही मालवणी परिसरात इमारतीचा भाग कोसळला होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील पाच मजली भानुशाली इमारत कोसळण्याची दुर्घटनाही घडली होती.