दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | परळी | सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून कानाकोपऱयातून लाखो भाविक तसेच पर्यटक येत असतात. सज्जनगडचा तसेच परिसराचा भौगोलीक विकास आराखडा तयार केल्यास पंचक्रोशीला विकासाला व पर्यटनाला चालना मिळणार आहे. असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे यांनी परळी उरमोडी धरणानजीक रोपवे जागेच्या पाहणी प्रसंगी केले. यावेळी त्यांनी रोपवे, परळी सज्जनगड पायरी मार्ग तसेच तटबंदी दुरुस्तीसाठी अधिकाऱयांना सुचना केल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजु भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, अधिक्षक अभियंता संजय मुंगीलवार, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता राहूल अहिरे, शाखा अभियंता रवि अंबेकर, परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव तसेच मान्यवर उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सज्जनगडावर पायरीमार्गाने वयोवृध्द भाविक तसेच पर्यटक दिव्यांग व्यक्ती यांना सज्जनगडावर जाने सुलभ व्हावे तसेच पर्यटनाला चालना मिळावी म्हणून सज्जनगड रोपवे साठी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असून तो मंजूर झाल्याने परळी मार्गे सज्जनगड रोपवे हे काम हाती घेण्यात आले आहे. काही महिण्यातच हे काम पुर्णत्वास येईल या बरोबरच परळी सज्जनगड पायरीमार्गाचे काम वन खात्यामार्फत पर्यटन अथवा जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त होताच हे ही काम मार्गी लागेल. यामार्गावर भाविकांना बसण्यासाठी निवारा शेड नवीन पायऱया वृक्ष लागवड आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. सज्जनगड तसेच परिसरातील गावांचा विकास पर्यटनाच्या धरतीवर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बुरुज-तटबंदी डागडुजी महत्त्वाची
परळी पंचक्रोशीतील युवक संघटीत होवून सज्जनगडावर बुरुज तटबंदी स्वच्छता मोहिम तसेच मशालोउत्सव हे कार्यक्रम खुपच कौतुकास्पद आहे. गडावरील बुरुज तटबंदीच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.