कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी कृषी सभापती मंगेश धुमाळ, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके आदी. |
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.११(रणजित लेंभे) : कृषि विभागाचा “किफायतशीर ऊस रोपवाटिका” परिसंवाद प्रेरणादायी असून कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने तालुक्यात केलेले काम कौतुकास्पद असून शेतीव्यवसाय व शेतकरी यांची गरज COVID-19 या महामारीच्या काळात स्पष्ट झाली आहे. कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी असून सर्वानी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषि व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ यांनी केले. वाघोली ता कोरेगाव येथे किफायतशीर ऊस रोपवाटिका परिसंवाद शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद फळबाग लागवड व गांडूळ खत युनिट शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, विद्यापीठ कृषी संजीवनी सप्ताह समन्वयक डॉक्टर सुभाष घोडके डॉक्टर नावडकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचे दि. १ ते ७ जुलै २०२० कालावधीत राबविण्यात येणारा “कृषि संजीवनी सप्ताह-२०२०” कार्यक्रमाचे औचित्य साधून किफायतशीर ऊस रोपवाटिका परिसंवाद शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, फळबाग लागवड व गांडूळ खत युनिट शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन मौजे वाघोली येथे करण्यात आले होते.
या दरम्यान वाघोली येथे सधन पेरू लागवड गांडुळ खत व कचऱ्यापासून गांडूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ करून आले लागवड, स्टॉबेरी प्रक्षेत्र भेट देण्यात आली. त्याच बरोबर मौजे-देऊर येथे सिताफळ लागवड, शेततळे व्यवस्थापन बाबत सुसंवाद घेण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच बशीरखान पठाण, कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे विवेक भोईटे, मार्केट कमिटी उपसभापती गुलाब जगताप उपसरपंच दीपक जगताप, प्रगतशील शेतकरी मेघराज भोईटे, मंडळ कृषी अधिकारी संतोष गावडे, कृषी पर्यवेक्षक तानाजी काशिद, बेलदार, कृषी सहायक चव्हाण, शिंदे, गायकवाड व शेतकरी उपस्थित होते. कृषी सहायक चतुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.