स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.११ (रणजित लेंभे) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण संस्थांनी मोबाईलव्दारे सुरू केलेल्या ऑनलाईन क्लासमुळे पालकांचीच उजळणी सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने सर्वञ थैमान घातले आहे. यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याचा विचार करून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत.परंतु ग्रामीण भागात अॅन्ड्रॉईड मोबाईल वापराबाबत पालकांमध्ये असलेले अपुरे ज्ञान व नोकरी वा व्यवसायामुळे पालक घराबाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासची घरातील वयस्कर मंडळींवर जबाबदारी येताच त्यांना ऑनलाईन क्लासची माहिती आत्मसात करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासदरम्यान जणू पालकांचीच उजळणी सूरू असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.
याशिवाय विस्कळीत मोबाईल सेवा, बालकांचा हट्टीपणा यांसारख्या अनेक समस्यांचा सामना ऑनलाइन क्लासेस साठी करावा लागत आहे.
दरम्यान शिक्षण संस्थांनी सुरू केलेल्या ऑनलाइन क्लासेस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असले तरी काही शिक्षण संस्थांनी ऑनलाईन क्लास सुरू करताच पालकांकडे चालू शैक्षणिक वर्षाच्या फी साठी दगादा लावला आहे.
दरम्यान सध्याची कोविड- १९ विषाणू संसर्ग व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांनी चालू वर्षाची विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.