दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती शहरातील नाना-नानी पार्क येथील दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यानिमित्त गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.
परमपूज्य श्री मोरेदादा यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गेली ७ दिवस गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू होता. यामध्ये जवळपास १०८ सेवेकर्यांनी सहभाग घेतला. दि. १५ डिसेंबर रोजी नामजप व प्रवचन करून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला व पौर्णिमेनिमित्त अभिषेक व होम हवन कार्यक्रम संपन्न झाला.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ व श्री स्वामी समर्थ यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व पदाधिकारी, भाविक, सेवेकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.