सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी (ता. सातारा) येथील प्राचीन हेमाडपंथी केदारेश्वर व महादेव मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १२ एप्रिल : सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी (ता. सातारा) येथील प्राचीन केदारेश्वर व महादेव या दोन शिवमंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. हा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ना. श्रीमती सुनेत्रा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.
१३ ते १४ व्या शतकातील प्राचीन आणि ऐतिहासिक ठेवा
परळी येथे असलेली केदारेश्वर व महादेव ही दोन्ही मंदिरे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील असून ती १३ ते १४ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या दोन्ही मंदिरांमध्ये अत्यंत सुंदर आणि सुबक असे कोरीव काम असून, येथे दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. मात्र, सद्यस्थितीत या मंदिरांची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती.
शासनाकडून जीर्णोद्धाराला प्रशासकीय मान्यता
हा ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातन ठेवा जतन करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राज्य शासनाकडे विशेष प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेणी यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत परळी येथील या शिवमंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’कडील अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यास अधिकृत मान्यता दिली. त्यानुसार, राज्य सरकारने या कामासाठी ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
भाविकांमधून मोठे समाधान व्यक्त
मंजूर झालेल्या या भरीव निधीमधून या प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासह परिसरात विविध विकासात्मक कामे केली जाणार आहेत. केदारेश्वर व महादेव मंदिर हा पुरातन आणि अनमोल ठेवा संवर्धित करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यामुळे परळी खोऱ्यातील जनतेसह राज्यभरातील भाविकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

