
स्थैर्य, कुरवली खुर्द, दि. ०९ सप्टेंबर : “यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी कोणते दुर्गुण टाळावेत, याची शिकवण तथागत भगवान बुद्धांनी ‘पराभव सुत्त’मध्ये दिली आहे. जो माणूस या दुर्गुणांपासून दूर राहून सत्कर्म करतो, तो जीवनात कधीही पराभूत होत नाही,” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी घोरपडे यांनी मानवी जीवनाच्या अधोगतीला कारणीभूत ठरणाऱ्या १२ प्रमुख कारणांचे विवेचन केले. यामध्ये धम्माचा द्वेष करणे, दुर्जनांची संगत, आळस, वृद्ध आई-वडिलांची सेवा न करणे, अहंकार, व्यसनाधीनता आणि अवाजवी हाव बाळगणे यांसारख्या कारणांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, फलटण तालुक्याचे भूषण आणि मुंबई येथील ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून, कुरवली खुर्द गावातील उपासक-उपासिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली. तसेच, उपस्थितांना संविधान प्रस्ताविका आणि सूत्रपठन पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका महासचिव बाबासाहेब जगताप यांनी भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र मोरे व बजीरंग गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष महावीर भालेराव, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, बजीरंग गायकवाड, तालुका संघटक विजय जगताप, लक्ष्मण निकाळजे, संघराज निकाळजे यांच्यासह गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.